
मतदार याद्यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत राबवण्यात येत असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) मोहिमेंतर्गत शहापूर नगरपंचायत कार्यालयात आज शिबीर घेण्यात आले. मात्र मतदार नोंदणी व दुरुस्तीचे अर्ज काही नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींकडे देण्यात आल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.
एसआयआर मोहिमेंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नोंद अचूक करण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणे अपेक्षित आहे. मात्र काही बीएलओंनी कामाचा ताण व मतदारांचे पत्ते शोधण्यातील अडचणीचे कारण देत मतदार नोंदणीचे फॉर्म गठ्याने कार्यकर्त्यांकडे दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी केला आहे.






























































