
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान देशातील मतदार यादीत नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेत एक मोठा बदल होणार आहे. निवडणूक आयोगाने नव्या मतदारांच्या नाव नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म-6 च्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये एक नवी तरतूद जोडण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत आता मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या आई-वडिलांबाबत मतदार यादीमधील आधीच्या एसआयआरमधील स्थितीची माहिती द्यावी लागेल.
निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयएनईटी’ या पोर्टलवर जो नवा फॉर्म-6 अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये एक तांत्रिक बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. पोर्टलवर असलेल्या फॉर्ममध्ये एक डिक्लरेशन फॉर्म जोडण्यात आला आहे. या घोषणापत्रामधून अर्जदाराला आधीच्या एसआयआरमधील त्याच्या आई-वडिलांच्या नोंदीची माहिती द्यावी लागेल.
फॉर्ममधील नवा भाग हा 2025-26 या काळात ज्या राज्यांमध्ये एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा सुरू आहे अशा राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशातील ऑनलाईन अर्जदारांना दिसत आहे. मात्र या बदलाबाबत एक पेचही दिसून येत आहे. तो म्हणजे निवडणूक आयोगाने फॉर्म-6 मधील या बदलाबाबत कुठलीही कायदेशीर उपाययोजना केलेली नाही.
देशात गेल्या वर्षीपासून एसआयआरची प्रक्रिया सुरू झाली असून दहा राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच आतापर्यंत या प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील मतदार यादीमधून 5.58 कोटींहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आली आहेत.




























































