
मियामी ः इंग्लंडच्या विजयाचा नायक ज्युड बेलिंगहॅम सामना संपताच चाहत्यांच्या गराडय़ात अडकला. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आणि स्वाक्षरी मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. त्याने परिधान केलेल्या जर्सीची
ऑनलाइन लिलावात लाखो रुपयांची बोली लागण्याची चर्चा सुरू झाली. इंग्लंडच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ‘भविष्यातला कर्णधार’ घोषित करत उपांत्य फेरीपूर्वीच त्याचा गौरव सुरू केला.
मेस्सीसाठी निळे–पांढरे समुद्र
पॅन्सस सिटी ः सामना संपल्यानंतरही अर्जेंटिनाचे चाहते पॅन्सस सिटीच्या स्टेडियमबाहेर दोन तास थांबले होते. हजारो चाहत्यांनी फक्त मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी संघाच्या बसभोवती गर्दी केली. मेस्सीनेही बसच्या खिडकीतून हात हलवत आपल्या चाहत्यांचे अभिवादन केले आणि त्यानंतर संपूर्ण परिसर ‘मेस्सी… मेस्सी…’च्या घोषणांनी दणाणून गेला.
स्विस चाहत्यांचे अश्रू
पॅन्सस सिटी ः स्वित्झर्लंडचा पराभव होताच अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाले. स्टेडियमबाहेर अनेकांनी खेळाडूंचे टाळय़ांच्या गजरात स्वागत केले. ‘तुम्ही हरला नाही, लढलात,’ अशा घोषणा देत त्यांनी संघाचे मनोधैर्य वाढवले. पराभूत असूनही संघाने अर्जेंटिनाला दिलेली कडवी झुंज स्विस माध्यमांनी ‘अभिमानाचा पराभव’ अशी गौरवली. त्यामुळे स्विस चाहत्यांच्या डोळय़ांत अश्रू असले तरी निराशा झळकत नव्हती.
हालांदची आदर्श भेट
मियामी ः नॉर्वेचे स्वप्न भंगले तरी अर्लिंग हालांदने निराशा चेहऱयावर न दाखवता स्टेडियमबाहेर लहान चाहत्यांसोबत वेळ घालवला. त्याने अनेक मुलांना स्वाक्षऱया दिल्या, पह्टो काढले आणि जर्सी भेट दिली. पराभवानंतरही चाहत्यांच्या हीरोने कसे राहायचे, याचा आदर्श हालांदने आपल्या वर्तनातून घालून दिला.
इंग्लंडच्या पबमध्ये जल्लोष
मियामी ः लंडन, मँचेस्टर,
बार्ंमगहॅम आणि लिव्हरपूलमधील पब मध्यरात्रीनंतरही खचाखच भरले होते. इंग्लंडच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहत्यांनी गाणी, नृत्य आणि फटाक्यांची आतषबाजी केली. एवढेच नव्हे तर ‘इट्स कमिंग होम’च्या घोषणा पुन्हा घुमू लागल्या. पोलिसांना काही ठिकाणी वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त बंदोबस्त करावा लागला.
रात्र ढोलताशांची
ब्युनोस आयर्स ः अर्जेंटिनामध्ये मध्यरात्र उलटल्यानंतरही रस्ते रिकामे झाले नव्हते. चोहोबाजूंनी हजारो अर्जेंटाईन चाहते आपला निळा राष्ट्रध्वज घेऊन नाचत होते. ढोल-ताशे, गाणी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण शहर जागे होते. उपांत्य फेरीचे तिकीट मिळताच अनेकांनी थेट अंतिम फेरीचे आरक्षण करण्यास सुरुवात केल्याची चर्चाही रंगली.
वाहतूक कोलमडली
पॅन्सस सिटी ः सामना संपल्यानंतर हजारो चाहत्यांनी एकाच वेळी स्टेडियम सोडल्याने महामार्गांवर लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या. रेल्वे, बस आणि टॅक्सी सेवांवर प्रचंड ताण आला. स्थानिक प्रशासनाने अतिरिक्त शटल बस सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तरीही अनेक चाहत्यांना हॉटेल गाठण्यासाठी दोन तासांहून अधिक प्रतीक्षा करावी लागली. हा कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेलाही चाहत्यांनी आनंदाचा भाग बनवत आपला प्रवास यादगार केला.




























































