
कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाच्या निवडीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विद्यमान सभापती अधिक माने यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी २१ जुलै रोजी सकाळी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या २०२३ च्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत ‘शेतकरी सहकार विकास’ पॅनेलने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवरील सत्ता कायम राखली होती. त्यानंतर पक्षनेतृत्वाने सत्तेचे संतुलन राखत टप्प्याटप्प्याने विविध संचालकांना सभापतिपदाची संधी दिली. पहिल्यांदा जयवंत घोरपडे, त्यानंतर पांडुरंग भोसले, कल्याण भोसले आणि अलीकडे अधिक माने यांनी सभापती म्हणून कामकाज पाहिले.
अधिक माने यांनी ३ जून रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै रोजी सभापतिपदाची निवड होणार आहे.
दरम्यान, राहुल निकम की बापूसाहेब चव्हाण की, ऐनवेळी नवा चेहरा, या प्रश्नावरील चर्चांना वेग आला आहे. बाजार समितीवरील सत्ता महाविकास आघाडी समर्थित पॅनेलकडे असल्याने अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.




























































