
तिरुपतीमधी रस्त्यांवर धावणाऱ्या परिवहन बसमध्ये वसई-विरार पालिकेचे इंडिकेटर्स झळकले आहेत. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानला भेट देणाऱ्या वसईमधील भक्तांच्याच निदर्शनास आली असून त्यांना धक्का बसला.
बसच्या इलेक्ट्रिक इंडिकेटरवर चक्क ‘वसई-विरार महापालिका परिवहन सेवा’ असा फलक झळकलेला दिसून आला. कोडिंग करताना चुकून घोळ झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दैनिक ‘सामना’चे वसईतील प्रतिनिधी मनीष म्हात्रे हे तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी गेले होते. तिरुपती येथून त्यांनी गावात जाण्यासाठी बसने प्रवास सुरू केला तेव्हा त्यांनादेखील चालकाच्या सीटमागील इलेक्ट्रॉनिक नामफलकावर सतत वसई-विरार महापालिका परिवहन सेवा’ असा फलक झळकत असल्याचे दिसून आले. वसई-विरारमधील परिवहनच्या बसेस या ऑलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड या कंपनीमार्फत मिळाल्या आहेत. तिरुपतीमध्येदेखील याच कंपनीच्या बसेस रस्त्यावर धावत असून कोडिंगच्या घोळामुळे वसई-विरारचा नामफलक चुकून लागला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबतचा खुलासा कंपनीकडून मागवला असल्याचे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले.





























































