
गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि डोंगराळ भागात निर्माण झालेल्या ढगफुटीसदृश परिस्थितीचा फटका ऐतिहासिक तांदुळवाडी किल्ला परिसरालाही बसला आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. भूस्खलनामुळे लालठाणे पाटीलपाड्यासह पायथ्यावरील वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.
भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर माती, मोठमोठे दगड आणि झाडे मुख्य मार्गावर कोसळली आहेत. त्यामुळे किल्ल्याकडे जाणारी पायवाट पूर्णपणे बाधित झाली असून परिसरात अद्यापही दगड आणि माती घसरण्याचा धोका कायम आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. तांदुळवाडी किल्ला हा पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचा ऐतिहासिक व पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक आणि ट्रेकर्स येथे भेट देत असतात. मात्र सध्या निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे प्रशासनाने परिसराची तातडीने पाहणी करून भूस्खलनग्रस्त मार्गावरील मलबा हटवावा, मार्ग सुरक्षित करावा आणि आवश्यक त्या सुरक्षाव्यवस्था उभाराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
भूस्खलनाचा धोका केवळ किल्ल्यापुरता मर्यादित नसून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लालठाणे पाटीलपाड्यासह अन्य वस्त्यांनाही संभाव्य धोका निर्माण झाला आहे. भविष्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यास स्थानिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
किल्ल्याच्या संवर्धनाची गरज
तांदुळवाडी किल्ल्याच्या संवर्धनाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुर्गप्रेमींनी किल्ल्याची नियमित देखभाल, संरक्षण भिंतीची दुरुस्ती, सुरक्षित पायवाटांची निर्मिती, आपत्कालीन मदत सुविधा आणि पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.





























































