
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाऐवजी स्वतःचे संविधान हिंदुस्थानात आणायचे आहे. त्यासाठीच इतर पक्षांतील आमदार-खासदार खरेदी केले जात आहेत, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या जाणीव ट्रस्टच्या वतीने काळाचौकी येथील अभ्युदय नगर सभागृह आणि मरीन लाइन्स येथील मुंबई विद्यापीठ जिमखान्यात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचा विविध मुद्दय़ांवरून खरपूस समाचार घेतला. भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचे आहे. त्यासाठी बहुमत गोळा केले जात आहे आणि म्हणूनच आमदार-खासदारांची खरेदी केली जात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
ईडीला चंपतराय दिसत नाहीत, शेखर सुमन दिसतील
सीबीआय, आयटी आणि ईडीवरही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. सीबीआय, आयटी हे भाजपचे पोपट आहेत आणि ईडीला राम मंदिर लुटणारे चंपत राय दिसत नाहीत, कदाचित शेखर सुमन दिसतील, असा टोला त्यांनी लगावला. सीबीआय चंपतराय किंवा मिश्रा यांच्या घरी का जात नाही आणि या सर्वांत भाजप व पंतप्रधान महोदयांची भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपच खरी हिंदुद्रोही, देशद्रोही
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. भाजपने त्यासाठी कायदा आणला नाही, पण श्रेय घेण्याचा मात्र प्रयत्न सुरू आहे. अशी टीका करतानाच, सीसीटीव्हीवर धोतर टापून राम मंदिराची दानपेटी लुटणारे भाजपवालेच खरे हिंदुद्रोही आणि खरे देशद्रोही आहेत, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबादेवीची जमीन घ्याल तर याद राखा
‘वाराणसीत कॉरिडॉरच्या नावाखाली अनेक मंदिरे भाजपने सपाट केली. उत्तर प्रदेशातही कालीमातेचे मंदिर पाडले. आता मुंबईतही मुंबादेवीच्या परिसरात कॉरिडॉरच्या नावाखाली जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण याद राखा, मुंबादेवीच्या जमिनीला हात लावाल तर शिवसेना लढा देईल’, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
भाजपचे सध्याचे प्रमुख चेहरे मिक्सिंगवाले
‘भाजप नेते आमिर खानला लक्ष्य करत आहेत. पण आमिर खानचे पह्टो तर मोदींसोबत आहेत, त्यांची चांगली मैत्री आहे. उज्जैनमध्ये ‘लँड जिहाद’ कोणी केला? उज्जैनच्या पावन भूमीला कोणी लुटले? तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लुटले. आडवाणी, वाजपेयी, मुंडे-महाजन काकांची भाजप आता बदलली आहे. सध्याचे भाजपचे प्रमुख चेहरे हे मिक्सिंगवाले, इथेनॉल मिक्सिंगवाले आहेत,’ अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली.



























































