
महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण त्याची अंमलबजावणी कधीपासून करणार याबाबत अद्याप निश्चिती नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरू आहे. सरकारने आधी 30 जून ही तारीख दिली होती. नंतर तांत्रिक अडचणी सांगत 5 जुलैची डेडलाईन दिली आणि आता दस्तुरखुद्द कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुलै संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे पंढरीच्या वारीत पांडुरंगाच्या शपथेवर सांगितले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त दुसऱ्यांदा हुकला. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डाटा केंद्र शासनाकडून मागवला गेला आहे. तो येईपर्यंत कर्जमाफी देता येणार नाही. त्यातच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या लाखांमध्ये असल्याचे सांगितले जाते.
निकषांमध्ये नाममात्र बदल
कृषीमंत्री भरणे यांनी आज पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफीबाबत सवाल केला. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडून कर्जमाफीसाठी तरतूद केली आहे. तसेच कर्जमाफीच्या निकषांमध्ये काही नाममात्र बदलही करण्यात आले आहेत, असे भरणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा 56 लाख आकडा कायम राहणार
कर्जमाफीचा लाभ दिला जाणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा 56 लाख आहे. तो कमी होणार नाही असा दावा भरणे यांनी केला. बजेट मंजूर झालेय, राज्यपालांची सहीसुद्धा एक-दोन दिवसांत होईल आणि त्यानंतर ऑगस्ट उजाडण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे भरणे म्हणाले.




























































