
सोलापूर शहराजवळील महत्त्वाचे असलेल्या होटगी जंक्शन स्टेशनवर कामाचा ताण व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून रेल्वे स्टेशन मास्तर सत्येंद्र नारायणसिंह यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. या घटनेने जंक्शन स्टेशनवर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सोलापूर शहराजवळील होटगी जंक्शन रेल्वे स्टेशन हे दक्षिण भारताला जोडणारे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुपरिटेंडेंट म्हणजेच स्टेशन मास्तर सत्येंद्र नारायणसिंह यांना गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या पदाशी संबंधित नसलेली कामे त्यांच्याकडून दबाव टाकून करून घेतली जात आहेत.
शनिवारी सकाळी सत्येंद्र नारायणसिंह यांनी रेल्वेस्थानकाजवळील जवळपास सव्वाशे फूट उंच असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. यामुळे रेल्वेस्थानकातील वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलीस आणि वळसंग पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. होटगी जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या येथे मोठ्या प्रमाणावर येतात-जातात. सुरक्षेच्या दृष्टीने हे स्थानक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आंदोलनातून कर्मचाऱ्यांच्या कामावरील ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




























































