
अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीच्या लुटीविरोधात शिवसेनेने राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन छेडले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. बाबर तर परकीय आक्रमक होता, आता विश्वस्त हिंदूंनीच राम मंदिर लुटले, असे म्हणत शिवसैनिकांनी यावेळी पूर्ण ताकदीनिशी रामरक्षा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
राम मंदिर आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झालेले शिवसेनेचे विद्यमान बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कारसेवकांच्या बलिदानानंतर कित्येक वर्षांनी संपूर्ण देशाचे आणि रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले असताना, त्याच मंदिरात भ्रष्टाचाराची आणि लुटीची वाळवी लागावी, ही अत्यंत व्यथित करणारी आणि मनाला क्लेश देणारी बाब आहे, अशा भावना खेडेकर यांनी व्यक्त केल्या. बाबरने दरोडा टाकला तेव्हा तो परकीय आक्रमक होता, पण आज प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे विश्वस्तच जर दरोडे टाकत असतील, तर हे पाप देश आणि रामभक्त कधीही खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तसेच राम मंदिर ट्रस्टने महाराष्ट्रातील शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान आणि कर्मयोगी शिवशंकरभाऊंच्या पारदर्शकतेचा धडा घ्यावा, असे ते म्हणाले. या बैठकीला मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व गजानन वाघ, जयश्री शेळके, दत्ता पाटील, वसंतराव भोजने, डी. एस. लहाने, सुमित सरदार, नंदू कऱ्हाडे, शुभम पाटील, किसन झाल्टे, गजानन धांडे, सिद्धेश्वर आंधळे आदी उपस्थित होते.
गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणार
शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळात बुलढाण्याच्या प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.



























































