Ratnagiri News – रिव्हर्स घेताना कार थेट नदीत कोसळली; पाणी कमी असल्याने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील भाजी मंडईच्या मागील शिवनदीलगत रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. भाजी खरेदी करून परत निघालेल्या कारचालकाचा रिव्हर्स घेताना अंदाज चुकल्याने कार थेट शिवनदीत कोसळली. सुदैवाने नदीत पाण्याची पातळी कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.

भाजी मंडईच्या मागील परिसरात एका भाजी विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर संबंधित चालकाने शिवनदीच्या काठालगत उभी केलेली कार रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. मात्र, वाहन चालकाचा अंदाज चुकल्याने कार थेट नदीत गेली. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बघ्यांची गर्दी झाली. माहिती मिळताच तातडीने क्रेन बोलावण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने कार सुरक्षितपणे नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतील चिखलामुळे संपूर्ण कार चिखलाने माखली होती. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून, सुदैवाने चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे भाजी मंडई परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तर या भागातही शिव नदीलगत संरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.