
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंडणगड तालुक्यातील वेसवी बंदरात जलपर्यटनासाठी $1$ कोटी रुपये खर्च करून सन २०१६-१७ मध्ये एक हाऊसबोट उपलब्ध करून दिली होती. मात्र, या हाऊसबोटीला वापरापूर्वीच जलसमाधी मिळाली आहे. सध्या ती रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला खाडीमध्ये सडत पडली आहे.
हाऊसबोट चालवण्यासाठी ठेकेदाराला $25$ लाखांची अनामत रक्कम भरावी लागणार होती. जलपर्यटनाचा नव्याने सुरू होणारा व्यवसाय किती प्रमाणात चालेल, याचा ठेकेदाराला भरवसा नसल्याने एवढी मोठी रक्कम भरण्यास कोणीही पुढे आले नाही. परिणामी, कोट्यवधी रुपयांच्या हाऊसबोटीला वापरापूर्वीच जलसमाधी मिळाली.
या हाऊसबोटीमध्येच राहण्याची सोय होती. कोकण समुद्रकिनारपट्टीचे नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या बोटीच्या सफरीतून पाहता येणार होते. यात दोन आलीशान रूम होत्या. मात्र, पर्यटकांना एमटीडीसीने $10$ तासांच्या जलपर्यटनाची अट घातली होती. यासाठी $8$ हजार रुपये भाडे आकारले जाणार होते. त्यात जेवण, चहा, नाश्ता आदी सुविधा अंतर्भूत होत्या.
“एमटीडीसीने अनामत रकमेत व प्रवासी तिकीट भाड्यात तडजोड केली असती, तर हाऊसबोटीचा उद्देश सफल झाला असता. हाऊसबोट वापराविना सडून गेली.”
— इस्माईल उंडरे, बाणकोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच


























































