
दापोली तालुक्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ऐतिहासिक वारसा असलेल्या हर्णे येथील गोवा किल्ल्यालाही बसला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नव्याने उभारलेल्या तटबंदीचा काही भाग कोसळल्याने शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच कामाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करत कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त केली आहे.
शासनाने नुकतेच कोट्यवधी रुपये खर्च करून किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले होते. अरबी समुद्रकिनारी वसलेला गोवा किल्ला हा मराठा आरमाराच्या इतिहासाचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्याचे संवर्धन सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण होते. परंतु, काम अंतिम टप्प्यात आले असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे तटबंदीच्या एका भागाचे नुकसान झाले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गोवा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. दापोलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. त्यामुळे संवर्धनाचे काम अधिक दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने पूर्ण करून या ऐतिहासिक वारशाचे जतन करावे, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे मातीची धूप
मुसळधार पाऊस, मातीची धूप आणि समुद्रकिनारी निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तटबंदी कोसळल्याचे प्राथमिक स्तरावर सांगितले जात आहे. नव्याने बांधलेली तटबंदी एवढ्या कमी कालावधीत कोसळल्याने संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून कामाच्या दर्जाची तपासणी करावी आणि नुकसानग्रस्त तटबंदी तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

























































