Pune Accident जेजुरीजवळ दिंडी सोहळ्यातील ट्रकची वारकऱ्यांना धडक; 3 महिलांचा मृत्यू, चार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सोमवारी (दि. १३ ) सकाळी दिंड्या जेजुरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना भीषण अपघात झाला आहे. दिंडीतील ट्रक थेट वारकरी महिलांच्या अंगावर आल्यामुळे झालेल्या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा अपघात घडला.

आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीच्या ट्रकचालकाने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील ७ महिला वारकरी महिलांना धडक दिली. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून चार महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मदतकार्य सुरू असून पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.