
ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुदतबाह्य दूध, पावाच्या पुड्यांसह विविध नाशवंत माल सोसायटीच्या आवारात फेकून दिले होते. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशी व पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रकार घडला. या कंपनीकडून गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या कागदाचीही विक्री केली जात असल्याचे उघड होताच अन्न व औषध प्रशासनाने दणका देत कंपनीचे गोदाम सील केले.
नौपाड्यातील शिवानंद सोसायटीत एका कंपनीचे गोदाम होते. बड्या कंपनीच्या नावाने ग्राहकांना दूध, पावासह जीवनावश्यक वस्तू व नाशवंत मालाची विक्री केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून विक्री न झालेले साहित्य शिवानंद सोसायटीच्या आवारात फेकून दिले जात होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर एफडीएने कंपनीच्या गोदामाला सील ठोकले.





























































