
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू जहाजांवर क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाला असून इतर आठ जण जखमी झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘मोम्बासा’ (Mombasa) आणि ‘अल बहिया’ (Al Bahiyah) ही दोन्ही जहाजे ओमानच्या सागरी हद्दीतील सामुद्रधुनीच्या दक्षिण मार्गावरून प्रवास करत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात जीव गमवावा लागलेला हिंदुस्थानी नागरिक ‘मोम्बासा’ या जहाजावर कार्यरत होता.
हल्ल्यात जखमी झालेल्या आठ जणांपैकी चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये सहा भारतीय नागरिक असून, उर्वरित दोन जण युक्रेनचे रहिवासी आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली.
क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दोन्ही तेलवाहू जहाजांना मोठी आग लागली आणि जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, जहाजावरील कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने आगीवर नियंत्रण मिळवले.






























































