
राम मंदिर दानपेटी लूट प्रकरणी पंतप्रधान मोदी हे त्यांची ‘मन की बात’ उघड करतील, श्रीरामाची माफी मागतील, अशी जनतेची अपेक्षा होती, मात्र यापैकी काहीच घडले नाही व आता नृपेंद्र मिश्रा यांनी खेदाची फुसकुली सोडून रामभक्तांचा आणखी एक अपमान केला आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी यांनी घेतले. त्या दिवशी मोदी हे जणू विष्णूचे अवतार असल्याच्या थाटात वावरत होते. त्या भक्तीच्या रसमय वातावरणातही त्यांच्या चेहऱ्यावरचे ढोंग आणि अहंकार लपला नव्हता. त्याच अहंकाराचे अजीर्ण झाले व चोर राममंदिराच्या गाभाऱ्यात शिरून लूट करून गेले. आता तपास, अटका वगैरे सगळा फार्स आहे. नृपेंद्र मिश्रांचा ‘खेद’ हा त्याच फार्समधला प्रवेश आहे.
अयोध्येच्या राममंदिर लुटीवर नवे ‘रामायण’ घडून गेल्यानंतर काही लोकांना जाग आली. त्यात राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. मिश्रा यांनी आता सांगितले की, ‘‘अयोध्येतील राममंदिरातील दान अपहार प्रकरण हा एक कलंक आहे. त्यामुळे प्रत्येकाला अत्यंत अपमानित झाल्यासारखे वाटते.’’ नृपेंद्र मिश्रा हे मोदी सरकारचे केंद्रीय कॅबिनेट सचिव होते. ते उत्तर प्रदेश सरकारचेही मुख्य सचिव होते. मुलायम सिंह मुख्यमंत्री असताना अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार झाला, तो काही सरकारचा म्हणजे मुलायम सिंह यांचा आदेश नव्हता याची कबुली मिश्रा यांनी अलीकडेच दिली आणि भाजपची भलतीच कोंडी करून ठेवली. आता मिश्रा यांनी राममंदिर दान अपहाराच्या मुद्द्यावर ‘कलंकित’ झाल्याबाबतचे परखड मत व्यक्त केले. राममंदिर लुटीची व्याप्ती मोठी आहे व गेल्या 12-13 वर्षांत राममंदिर प्रकल्पाच्या नावावर 14 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा हिशेब कोणी देत नाही. मंदिर निर्माणानंतर ज्यांच्या हाती मंदिराच्या चाव्या होत्या त्यांच्याच लोकांनी रामाच्या दानपेट्या लुटल्या. हा लुटीचा आकडा किमान 500 कोटींचा आहे. रामाला अर्पण केलेले सोने, चांदी, जडजवाहीर यापैकी बऱ्याच मौल्यवान गोष्टी चोरीस गेल्या असतील तर सगळ्यात आधी राममंदिर ट्रस्टच्या खजिनदार, विश्वस्त मंडळास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे होते, पण नृपेंद्र मिश्रा यांनी फक्त खेद व्यक्त केला. ‘‘कलंकित झाल्यासारखे वाटते’’ अशा वैयक्तिक भावना व्यक्त केल्या. राममंदिर लुटीमुळे संपूर्ण हिंदू समाजाची
प्रतिमा कलंकित
झाली आहे. हिंदूंमध्ये अपमानित झाल्याची भावना आहे. अयोध्येत ‘राम’ राहिला नाही असे एकंदरीत वातावरण देशात निर्माण झाले आहे. राममंदिर लुटीचा स्फोट झाल्यावर अयोध्येत येणाऱ्या भक्तांच्या संख्येत घट झाली आहे. 75 टक्के श्रद्धाळूंचा ओघ घटला. दर्शनासाठी आधी चार-चार तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता अर्ध्या-पाऊण तासात रामाचे दर्शन होते. हॉटेल व्यवसायाला याचा फटका बसला. 25 टक्केच खोल्या जेमतेम भरल्या जातात. हार-प्रसाद विक्री करणारे ‘ठेले’वाले रोज चार-पाच हजारांची कमाई करत होते. आता हजारभर रुपयांचाही गल्ला होत नाही. ई-रिक्षा चालविणाऱ्यांचाही धंदा पडला आहे. रेस्टॉरंटची गर्दी कमी झाली. मंदिर चोरीचा हा फटका अयोध्येतील लहान व्यावसायिकांनाही बसला. अयोध्येच्या परिसरात आणखी शंभर नवी हॉटेल्स उभी राहत आहेत. त्यातील गुंतवणूकदारांची चिंता आजच्या स्थितीने वाढली आहे. अयोध्या हे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनले होते, पण ‘चोरी’ प्रकरणात धार्मिक पर्यटनाचे महत्त्वच संपले. राममंदिरातच चोरांचा सुळसुळाट झाला असेल तर प्रभू श्रीराम तरी तेथे सुरक्षित आहेत काय? सभोवती चोरांचे राज्य आल्याने ‘राम’ पुन्हा दंडकारण्यात निघून गेले नाहीत ना? अशा शंकेने देशभरातील रामभक्त बेजार झाले. त्यामुळे अयोध्येतील गर्दी ओसरली. नृपेंद्र मिश्रा यांनी आता खेद व्यक्त केला, पण अयोध्येतील मुख्य चोरांना अभय देऊन श्रीमान मिश्रा रामाला पुनः पुन्हा कलंकित करीत आहेत. राममंदिराची सर्व सूत्रे भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संस्थांकडेच होती. मंदिराच्या
चाव्या कमरेला खोचूनच
हे लोक तोऱ्यातोऱ्यात वावरत होते. मंदिर उभारले तेव्हा त्याचे श्रेय नरेंद्र मोदींनाच देण्याची चढाओढ सुरू झाली. मग मंदिरातील चोरी प्रकरणामुळे पंतप्रधान मोदी यांनाही कलंकित, अपमानित झाल्याचे का वाटू नये? प्रश्न फक्त दानपेटी आणि देणग्या चोरीचा नाही. भाजप आणि संघ परिवाराच्या विश्वासार्हतेलाच तडा गेला आहे. ज्यांच्यावर लुटमारीचा ठपका आहे ते सर्व लोक खुलेआम मंदिर परिसरात फिरत आहेत. पोलीस त्यांना साधे चौकशीला बोलवायला तयार नाहीत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातला हिंदूदेखील ‘चोरी’ प्रकरणानंतर उसळून बाहेर पडला नाही. राम मंदिर दानपेटी लूट प्रकरणी पंतप्रधान मोदी हे त्यांची ‘मन की बात’ उघड करतील, श्रीरामाची माफी मागतील, मंदिरासाठी हौतात्म्य पत्करलेल्या कारसेवकांच्या स्मृतींना नमस्कार करून खेद व्यक्त करतील, अशी जनतेची अपेक्षा होती, मात्र यापैकी काहीच घडले नाही व आता नृपेंद्र मिश्रा यांनी खेदाची फुसकुली सोडून रामभक्तांचा आणखी एक अपमान केला आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी यांनी घेतले. जगभरातल्या उत्सवमूर्तींना त्या काळात अयोध्येत जमा केले. त्या दिवशी मोदी हे जणू विष्णूचे अवतार असल्याच्या थाटात वावरत होते. त्या भक्तीच्या रसमय वातावरणातही त्यांच्या चेहऱ्यावरचे ढोंग आणि अहंकार लपला नव्हता. त्याच अहंकाराचे अजीर्ण झाले व चोर राममंदिराच्या गाभाऱ्यात शिरून लूट करून गेले. आता तपास, अटका वगैरे सगळा फार्स आहे. नृपेंद्र मिश्रांचा ‘खेद’ हा त्याच फार्समधला प्रवेश आहे.































































