
वातावरण बदलाचा सर्वात मोठा परिणाम हा आपल्या तब्येतीवर होतो. म्हणूनच वातावरण बदलल्यानंतर आपण आपल्या आहारातही योग्य तो बदल करणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे हे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात कोणताही जंतूसंसर्ग हा पटकन बळावतो आणि लागणही लागते. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या खाण्याकडे लक्ष देणे हे फार गरजेचे आहे.
पावसाळ्यात वातावरणात गारवा निर्माण होत असला तरी या काळात सर्दी, खोकला, ताप आणि घशाचे विकार वाढण्याची शक्यता असते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे पचनशक्ती कमी होऊन संसर्गाचा धोका वाढतो. योग्य आहार, आयुर्वेदिक काढे आणि नियमित योगाभ्यास यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत होऊ शकते.
तुळस-आले-काळी मिरी काढा- दोन कप पाण्यात तुळशीची 10 ते 12 पाने, आल्याचा लहान तुकडा आणि 3 ते 4 काळी मिरी उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून कोमटपणे प्या.
गुळवेल-हळद-पुदिना काढा- गुळवेलीचा तुकडा, अर्धा चमचा हळद आणि पुदिन्याची काही पाने दोन कप पाण्यात उकळून कोमटपणे सेवन करा.
दालचिनी-लवंग-काळी मिरी काढा- दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तुळशीची पाने एकत्र उकळून तयार केलेला काढाही उपयुक्त मानला जातो.
पावसाळ्यात हलके, ताजे आणि सहज पचणारे पदार्थ खावेत. मूग, उकडलेल्या भाज्या, गरम सूप आणि घरचे ताजे अन्न याला प्राधान्य द्यावे. तळलेले, शिळे किंवा उघड्यावर मिळणारे पदार्थ शक्यतो टाळावेत.




























































