
पंढरपूरकडे निघालेल्या पालख्यांना बीडवरून मार्गस्थ होताना पुढे मांजरसुंब्याचा घाट लागतो. या घाटात वारकर्यांना उर्जा मिळावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी यासाठी घाटाच्या पायथ्याला दरवर्षी वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र उभारण्यात येते. या अन्नछत्रामध्ये आत्तापर्यंत तब्बल पाच हजार वारकरी जेवून गेले असून आणखी चार दिवस वारकर्यांची ही सेवा दिवसरात्र राहणार आहे. किमान दहा हजार वारकरी या अन्नछत्राचा लाभ घेतील.
मांजरसुंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पाली येथे पाली ग्रामस्थ, बीड शहर आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने अखंड अन्नछत्र व प्रथमोपचार सेवा गेल्या कित्येक वर्षापासून राबविली जात आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक वारकरी या अन्नछत्रामध्ये येवून अन्न ग्रहण करतो. आत्तापार्यत तब्बल पाच हजार वारकर्यांनी अन्नछत्रात जेवण केले आहे. उर्वरित चार दिवसात पाच हजार वारकरी येथून जाणार असल्याचा अंदाज आहे. शेवटचा वारकरी जोपर्यंत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत नाही तोपर्यंत हे अन्नछत्र चालू असते.
मोफत भोजन, पिण्याचे पाणी, प्रथमोपचाराची सुविधा हा उपक्रम वारकर्यांसाठी मोठा आधार ठरतो. मांजरसुंब्याच्या घाटाची वाट यामुळे सोयीस्कर होवून जाते. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी, विनोद पिंगळे, बीडमधील व्यापारी आणि पालीचे ग्रामस्थ दिवसरात्र या ठिकाणी ठाण मांडून असतात. वारकर्यांसाठी हे अन्नछत्र मोठा आधार ठरले आहे.
अन्नछत्राला पोलीस अधीक्षक नवनीत काँवतांची भेट
पाली येथे आषाढी वारीनिमित्त जाणार्या हजारो वारकर्यांना मोफत अन्नछत्राच्या माध्यमातून भोजन, पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याने वारकर्यांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे. या अन्नछत्राला आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावकर्यांनी आणि व्यापारी महासंघाने त्यांचे स्वागत केले. या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक काँवत यांनी कौतुक केले.




























































