अंबाजोगाईकर भयभीत, परवा खून तर आज सापडला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील युवकाच्या खुनाची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात ४१ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू अथवा अपघात, याबाबतचे गूढ कायम असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मृत व्यक्तीचे नाव विवेक करपे (४१) असे असून ते मूळचे केज तालुक्यातील जवळबन गावचे रहिवासी होते. सध्या ते पत्नी आणि दोन मुलांसह केज येथे वास्तव्यास होते. वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खासगी शाळेत ते सेवक (शिपाई) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दहावीत शिकणारा मुलगा आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या विवाहाला १७ वर्षे झाली होती.

सोमवारी सकाळी तथागत चौकात एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पंचनामा करताना पोलिसांना त्यांच्या खिशात ट्रॅव्हल्सचे तिकीट आढळून आले. त्यामुळे ते केजहून किंवा अन्य ठिकाणाहून प्रवास करून अंबाजोगाईत आले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विवेक करपे यांना मद्यपानाचे व्यसन होते. तसेच वर्षभरापूर्वी त्यांच्या पोटावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे अतिमद्यप्राशन, प्रकृती बिघडणे किंवा इतर कोणतेही कारण त्यांच्या मृत्यूमागे आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याचबरोबर घातपाताची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही.

अंबाजोगाई शहरात अल्पावधीतच घडलेल्या दोन धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अंबाजोगाई पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.