आता पुरे झाले! शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे; राहुल गांधी यांचे देशभरातील विद्यार्थ्यांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी भारताची शिक्षण व्यवस्था “भ्रष्ट, अन्यायी, पक्षपाती आणि बेईमान” झाल्याचा आरोप करत, शिक्षण क्षेत्रात आता क्रांती घडवून आणण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “भ्रष्ट, अन्यायी, पक्षपाती आणि बेईमान हे चार शब्द माझे नाहीत, तर देशातील विद्यार्थी आज भारताच्या शिक्षण व्यवस्थेसाठी वापरत आहेत.” शिक्षण व्यवस्था आता विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याऐवजी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्ज, मानसिक ताण आणि नैराश्याकडे ढकलणारी बेईमान वसुली यंत्रणा बनली असल्याचा आरोप त्यांनी केला.

याच भ्रष्ट व्यवस्थेमुळे पेपरफुटीचे रॅकेट निर्माण झाले असून लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे केलेली मेहनत पेपरफुटीच्या एका घटनेमुळे वाया जाते. या प्रकरणात दोषी विक्रेते (व्हेंडर्स) आणि अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याऐवजी त्यांना नव्या निविदा आणि पदोन्नती मिळते, तर शिक्षा मात्र विद्यार्थ्यांनाच भोगावी लागते. तुटलेल्या स्वप्नांसह त्यांना एकटे सोडले जाते, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री हे सर्व घडत असताना मूक प्रेक्षक बनल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगले असून जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच, मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही या गंभीर विषयावर शांतता बाळगल्याची टीकाही त्यांनी केली.

“आता पुरे झाले. शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना 17 जुलै रोजी देहरादून येथे आयोजित ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आपल्या सोबत यावे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.