लेहमध्ये खासगी विमान कंपनीच्या अभियंत्याकडून हेरॉईन जप्त; विमानतळ कर्मचारी आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंधांचा तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमधील लेह येथे खासगी विमान कंपनीच्या एका विमान देखभाल अभियंत्याला (Aircraft Maintenance Engineer) हेरॉईनसह अटक करण्यात आली असून, या प्रकरणामुळे विमानतळावरील कर्मचारी आणि अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांमधील संभाव्य संबंधांचा तपास सुरू झाला आहे.

अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाने सोमवारी 22 वर्षीय अजय ठाकूर याला अटक केली. अजय ठाकूर हा हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याचा रहिवासी असून, तो लेहमध्ये एका खासगी विमान कंपनीत विमान देखभाल अभियंता म्हणून कार्यरत होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय ठाकूर हा खासगी कारमधून प्रवास करत असताना नियमित गस्त घालत असलेल्या एएनटीएफच्या पथकाने त्याला अडवले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून 2.27 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अटकेनंतर तपास यंत्रणांनी आता जप्त करण्यात आलेले हेरॉईन कुठून आले, त्यामागे कोणते आंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेट कार्यरत आहे आणि विमानतळावरील कर्मचारी, बाहेरील पुरवठादार तसेच स्थानिक ड्रग्ज विक्रेते यांच्यात काही संबंध आहेत का, याचा तपास सुरू केला आहे. आरोपी स्वतंत्रपणे काम करत होता की एखाद्या मोठ्या टोळीचा भाग होता, याचाही शोध घेतला जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई प्रशासनाच्या अंमली पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा साखळीला उद्ध्वस्त करण्याच्या धोरणाचा भाग आहे. गेल्या काही आठवड्यांत एएनटीएफने केलेल्या सलग कारवायांमधून लडाखमधील तरुणांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.