तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही; हदगावच्या नंदकिशोर देशमुख यांनी गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकरांना ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मिंधे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांची अवस्था सळो की पळो अशी झाली आहे. हदगाव तालुक्यातील इरापूर येथील कट्टर शिवसैनिकाने त्यांना फोन करुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी तुम्ही गद्दारी केली, आता तुम्ही शंभर टक्के निवडून येणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मिंधे गटात प्रवेश केल्यानंतर विमानतळावरील आगमनापासून किनवट तालुक्यातील सारखणी येथील कार्यक्रमापर्यंत शिवसैनिकांनी त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर गेल्या महिन्यात नांदेडच्या शिवसैनिकांनी पिंपळगाव येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले आणि प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी माहूरजवळ श्रीकांत शिंदे व आष्टीकर यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून प्रचंड घोषणाबाजी केली. या प्रचंड रोषाचा सामना त्यांना दररोज करावा लागत आहे.

हदगाव तालुक्यातील इरापूर येथील कट्टर शिवसैनिक नंदकिशोर देशमुख यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करुन, साहेब, तुम्ही असे का केले, आम्ही शिवसैनिकांनी मशालीच्या प्रचारासाठी जीवापाड मेहनत केली. तुमच्या प्रचारासाठी गावोगाव हिंडलो, लोकांचा रोष पत्करला, एक एक मतासाठी आम्ही मतदारांना याचना केली, असे असताना तुम्ही असे का केले, साहेब तुम्ही केले ते बरोबर केले नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तुम्हाला जीव लावला, तुमच्यावर विश्वास ठेवला. आता तुम्ही कदापी निवडून येणार नाही, शंभर टक्के खात्रीने सांगतो, तुम्ही आता परत निवडून येणार नाही हे खात्रीने सांगतो, तुमच्या गद्दारीने आम्ही शिवसैनिक संतापलेले आहोत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. त्यांची ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून, शिवसैनिकांनी पुन्हा एकदा गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा निषेध केला आहे.