Ratnagir News – शस्त्रक्रिया झालेल्या महिला रूग्णालाच उलटी पुसायला लावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा माफीनामा; रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रूग्णाला वॉर्ड मध्ये उलटी झाली.त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी ती उलटी त्याचा महिला रूग्णाकडून साफ करून घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती.हि घटना घडली त्यावेळी वॉर्डमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर हे कृत्य करणाऱ्या कर्मचारी पुर्वा सुतार यांनी माफीनामा लिहून दिला आहे.बीव्हीजी कंत्राटदार कंपनीने त्यांना यापुढे असे कृत्य घडल्यास कामावरून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.

संगीता मनोहर पवार या महिलेवर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी महिलांच्या वार्डामध्ये दाखल करण्यात आले.शनिवारी रात्री संगीता पवार यांना उलटी झाली त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी संगीता पवार हिलाच ती उलटी साफ करायला सांगितले.संगीता पवार यांचे पती मनोहर पवार यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे हाऊसकिपिॅगचा स्टाफ नाही म्हणून रूग्णांकडूनच साफसफाई करून घेतो असे सांगितले.दैनिक सामनाने हे वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. रूग्णालय प्रशासनाने हे कृत्य करणारी कर्मचारी कोण याचा शोध सुरू केला.त्यावेळी पुर्वा सुतार नावाच्या कर्मचारी असल्याची माहिती उघडकीस आली.प्रशासनाने सुतार यांची चौकशी केली असता हे कृत्य आपल्याकडून घडल्याची कबुली देताना माफीनामा लिहून दिला आहे.यापुढे आपल्या कडून अशी चूक होणार नाही असे लिहून देताना असं घडल्यास माझ्यावर कारवाई करावी असेही त्यांनी माफीनाम्यात लिहिले आहे.दरम्यान कंत्राटदार बीव्हीजी कंपनीनेही पुर्वा सुतार यांना हि शेवटचं संधी देत यापुढे असे कृत्य घडल्यास कामावरून काढून टाकण्यात येईल असे सांगितले आहे