
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मोदी सरकारच्या विश्वगुरू बनण्याच्या दाव्यांवरून सडकून टीका केली आहे. देशात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता हिंदुस्थान विश्वगुरू कसा बनणार? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिरातील देणगी चोरी आणि देशात बंद पडलेल्या हजारो शाळा या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या आहेत की, “काही वर्षांपूर्वी माझ्याही मनात होते की, आपला देश विश्वगुरू बनेल. पण आता मी पाहतेय की, विश्वगुरू होण्याच्या अगदी उलट गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. त्यामुळे हा मूर्खपणा आता थांबवा. विश्वगुरू न होण्यासाठी जेवढ्या गोष्टी शक्य आहेत, त्या सर्व सध्या घडत आहेत.”
राम मंदिर आणि शिक्षणाच्या मुद्द्यावरून संताप
२०४७ पर्यंत हिंदुस्थानला विश्वगुरू बनवण्याच्या दाव्यावर बोलताना त्यांनी थेट राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावर बोट ठेवले. “राम मंदिरातही दरोडा पडला आहे. विश्वगुरू होण्याचा नेमका निकष काय आहे, त्याची एक यादी आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू,” असे त्या म्हणाल्या. तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “आपण अधिकाधिक सुशिक्षित होऊ, असे सतत म्हटले जाते. पण प्रत्यक्षात देशातील ९३,००० शाळा बंद पडल्या आहेत.”



























































