
पावसाळ्यात घरामध्ये माश्यांचा प्रादुर्भाव वाढणे ही एक सामान्य पण तितकीच त्रासदायक समस्या आहे. दमट वातावरण आणि जागोजागी साचणारे पाणी यामुळे या दिवसात माश्यांची संख्या झपाट्याने वाढते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
बाजारात मिळणाऱ्या रासायनिक स्प्रेऐवजी घरातील नैसर्गिक घटकांचा वापर करणे केव्हाही उत्तम. पावसाळ्यात माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पुढील सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. त्यांच्या मदतीने तुम्ही रासायनिक घटकांशिवाय आपले घर स्वच्छ, सुवासिक आणि माश्यांपासून मुक्त ठेवू शकता.जाणुन घ्या तुम्ही कोणते उपाय घरच्याघरी करु शकता.
कापूर: घरातील माशा घालवण्यासाठी कापूर पेटवून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवून घ्या. कापूराच्या तीव्र वासामुळे घरात लपलेल्या माश्या लगेच बाहेर पळून जातात.
तुळस आणि पुदिना : घरात तुळशीचे किंवा पुदिन्याचे रोप ठेवा, अथवा त्यांची पाने बारीक करून घराच्या कोपऱ्यात किंवा खिडक्यांजवळ ठेवा. यांच्या सुवासामुळे माश्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत.
लवंग आणि लिंबू : एक लिंबू अर्धे कापून घ्या आणि त्यात ५ ते ६ लवंगा खोचून ठेवा. हे लिंबू घराच्या अशा ठिकाणी ठेवा जिथे माश्या जास्त येतात. लवंग आणि लिंबाचा एकत्र येणारा वास माश्यांना सहन होत नाही.
सफरचंद व्हिनेगर आणि डिश सोप : एका वाटीत थोडे सफरचंद व्हिनेगर घ्या आणि त्यात डिश वॉश लिक्विडचे काही थेंब टाका. ही वाटी जिथे माश्या जास्त असतील तिथे ठेवा. व्हिनेगरच्या वासाने माश्या त्याकडे आकर्षित होतात आणि त्यात पडून मरतात.
निलगिरी किंवा लॅव्हेंडर तेल : घर पुसताना त्या पाण्यात किंवा स्प्रे बॉटलमध्ये निलगिरी किंवा लॅव्हेंडर ऑइलचे काही थेंब टाकून घरात स्प्रे करा. यामुळे घर सुवासिक तर होतेच आणि माश्याही दूर होतात.
- पावसाळ्यात घरात कुठेही अन्न उघडे ठेवू नका आणि ओला कचरा जास्त वेळ घरात साचू देऊ नका, कारण यामुळे माश्या जास्त प्रमाणात वाढतात.






























































