
हिंदुस्थानच्या महिला संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडचा धुवा उडवत ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच इटलीतील लोनाटो शहरात पार पडलेल्या ‘ISSF Shotgun World Cup’मध्ये हिंदुस्थानची नेमबाज नीरू धांडा हिने इतिहास रचल्याची माहिती समोर आली. महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच हिंदुस्थानी महिला नेमबाज ठरली आहे. 26 वर्षीय नीरूने अंतिम फेरीत अत्यंत चुरशीच्या लढतीत 30 पैकी 27 अचूक नेम साधत अव्वल स्थान पटकावले. तिने फ्रान्सच्या माजी जागतिक विजेती कॅरोल कॉर्मेनियर (25 गुण, रौप्य) आणि इटलीच्या एरिका सेसा (कांस्य) यांसारख्या बलाढ्य स्पर्धकांना मागे टाकत आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरले.
नीरूने केवळ अंतिम फेरीतच नव्हे, तर पात्रता फेरीतही सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले होते. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये 75 पैकी 75 गुणांचा ‘परफेक्ट स्कोअर’ करत, तिने शेवटी 125 पैकी 121 गुणांसह थेट फायनलमध्ये प्रवेश केला. याच स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर हिंदुस्थानी नेमबाजांमध्ये मनीषा कीर हिला 125 पैकी 117 गुणांसह 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने तिची फायनलची संधी थोडक्यात हुकली, तर आशिमा अहलावत 106 स्पर्धकांमध्ये संयुक्तपणे 80 व्या स्थानावर राहिली.
!
Neeru earning her first-ever individual World Cup Gold medal in style! #NRAI | #INDIANSHOOTINGTEAM | #SHOOTINGLEAGUEOFINDIA | #ISSF https://t.co/emFQz3FoT4
— THE NRAI (@OfficialNRAI) July 11, 2026
या अभूतपूर्व यशानंतर भावना व्यक्त करताना नीरूने हा अनुभव अत्यंत थक्क करणारा असल्याचे सांगितले. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आल्यामुळे, तिने यावेळी सुवर्णपदक जिंकण्याचा पक्का निर्धार केला होता. जुन्या चुका आणि शूट-ऑफमधील अपयशाचा अडथळा पार केल्याचा आनंद मोठा असल्याचे सांगत नीरू म्हणाली की, खेळताना तिचे पूर्ण लक्ष केवळ त्याच क्षणावर होते आणि तिने प्रत्येक शॉटला एक नवीन संधी म्हणून पाहिले.





























































