
किल्ला कोर्टाला आज धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. कोर्ट परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याचे ई-मेलमध्ये नमूद केले होते. तसेच एलटीटी तमीळ टायगर लिबरेशन नावाने धमकावण्यात आले आहे. प्रशांत सोनकांबळे (39) हे किल्ला कोर्टात लिपिक टंकलेखक म्हणून नोकरीस आहेत. प्रशांत यांनी आज कामावर रुजू होऊन संगणक सुरू केला असता एका ई-मेल आयडीवरून तमीळ भाषेत ई-मेल आल्याचे आढळून आले. त्या ई-मेलमध्ये कोर्ट परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी एलटीटी तमीळ टायगर लिबरेशन नावाने देण्यात आली होती. याची तत्काळ दखल घेत प्रशांत यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच श्वान पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथकासह संपूर्ण कोर्ट व परिसराची तपासणी केली. परंतु संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही. पोलीस धमकीचा ई-मेल कोणी पाठवला याचा शोध घेत आहेत.




























































