
विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी एका आईने आपल्या दहा वर्षांच्या मुलाची हत्या केली. या महिलेला व तिच्या प्रियकराला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करत उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
गेल्या वर्षी सातारा सत्र न्यायालयाने या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याविरोधात या दोघांनी अपील याचिका दाखल केली आहे. या अपील याचिकेवर न्या. मिलिंद जाधव व न्या. नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अपील याचिकेवर निर्णय होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा स्थगित करुन जामीन मंजूर करावा, अशी मागणी या दोघांनी केली.
विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी आरोपींनी दहा वर्षांच्या मुलाला पाण्यात फेकले, असा पोलिसांचा आरोप आहे. दरम्यान, पत्नीचे विवाहबाह्य संबंध मला माहीत होते, अशी साक्ष पतीने दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या दाव्यात तथ्य राहत नाही. तरीदेखील आम्ही या मुद्द्यावर सविस्तर सुनावणी घेऊच, मात्र या अपील याचिकेवर येत्या काही वर्षांत सुनावणी होईल अशी आशा धूसरच आहे. परिणामी या दोन्ही आरोपींना २५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला जात आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
सात वर्षे कारागृहातच
घटना घडल्यापासून आम्ही कारागृहातच आहोत. आम्ही शिक्षेची सात वर्षे पूर्ण केली आहेत. अपील याचिकेवर निर्णय होईपर्यंत ही शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर करावा, अशी विनंती आरोपींनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.


























































