
चेन्नई सुपर किंग्जच्या इतिहासातील एका मोठय़ा युगाचा अंत झाला आहे. चेन्नईने हा एक कठीण निर्णय घेतला असून 18 वर्षांचे सर्वात विश्वासू मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशी संबंध तोडले आहेत. फ्रँचायझी आणि फ्लेमिंग यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. फ्लेमिंग यांनी संघाला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आणि त्यांची महेंद्रसिंग धोनीसोबतची भागीदारी संघाच्या यशाचा कणा होती. पण गेल्या सलग तीन हंगामांत प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्याचे संघाच्या लक्षात आले आणि आपल्या रणनीतीत बदल करण्याची वेळ आल्याचे त्यांनी दाखवून आहे. पण संघ आता फ्लेमिंग यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असेल. दोन माजी खेळाडू हे सीएसकेच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
महेंद्रसिंग धोनीचे नाव
जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा प्रश्न येतो तेव्हा धोनीपेक्षा चांगला पर्याय कोणीच असू शकत नाही हे सर्वांनाच माहीत आहे; कारण धोनीने हा संघ आपल्या हाताने घडवलेला आहे. त्यामुळे धोनीच्या नावाला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. खरं तर धोनी गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागे संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची अशीच भूमिका बजावत होताच. आता फक्त त्यावर अधिपृतपणे शिक्का मारला जाऊ शकतो. जर धोनीने खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर थेट मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. पण ती चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल आणि संघाच्या नव्या युगाच्या सुरुवातीसाठी सर्वात योग्य निर्णयही असेल.
द्रविडचीही चर्चा
गेल्या वर्षी राहुल द्रविडच्या नावाचीही चेन्नईसोबत जोरदार चर्चा झाली होती, मात्र प्रकरण मुख्य प्रशिक्षक पदापर्यंत पोहोचले नाही. पण आता वेळ अगदी योग्य असल्याचे जाणकारांना वाटत आहे. द्रविड भारतीय क्रिकेटमधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत. आयपीएलमध्ये पारंगत आहेत आणि त्यांनी टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंपून दिला आहे. सीएसकेमधील वातावरण साधारणपणे खूप शांत असते. त्यामुळे द्रविडची शिस्त व व्यावहारिक दृष्टिकोन संघाला पुन्हा यशाच्या मार्गावर आणू शकतो.




























































