
इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ‘बेझबॉल’ ही शैली आपल्या संघात रुजवणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलम यांना अखेर नारळ देण्याचे ठरवले आहे. मॅक्युलम यांच्या जागी बरेच माजी क्रिकेटपटू शर्यतीत आहेत, पण मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचे नाव आघाडीच्या उमेदवारांमध्ये चर्चेत आले आहे. कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत इंग्लंडला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इंग्लंडने प्रशिक्षकपदी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने (ECB) संभाव्य पर्यायांच्या यादीत द्रविडचा समावेश केला आहे. या यादीत इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि माजी फिरकीपटू रिचर्ड डॉसन यांचाही समावेश आहे. मॅक्युलम यांचा कसोटी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या ‘अॅशेस’ मालिकेपूर्वी नवीन प्रमुखाचा शोधात आहेत.
इंग्लंडमधील एका महत्त्वाच्या अहवालात असे म्हटले आहे की, ‘द्रविड पूर्णवेळ प्रशिक्षकपदावर परतण्यास फारसे उत्सुक नाहीत, पण असे असले तरी इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदाचे वेळापत्रक त्यांना आकर्षित करू शकते. कारण यामुळे त्यांना घरी अधिक वेळ घालवता येईल आणि त्याच वेळी कसोटी क्रिकेटमध्ये काम करणे सुरू ठेवता येईल. त्यामुळे द्रविड या प्रशिक्षकपदाचा विचार करत असल्याचे आता समोर आले आहे.’
द्रविड यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून प्रभावी अनुभव आहे. त्यांनी भारताला 2024 चा टी-20 विश्वचषक जिंपून दिला, तसेच 2023ची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023चा एकदिवसीय विश्वचषक यांच्या अंतिम सामन्यांपर्यंत संघाला नेले होते.
मॅक्युलम यांना हटवण्याचा निर्णय का घेतला?
कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ब्रेंडन मॅक्युलम यांचा कार्यकाळ संपवण्याचा निर्णय घेतला. अॅशेस मालिकेत इंग्लंडचा 1-4 असा झालेला दारुण पराभव आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेला 1-2 असा मालिका पराभव यामुळे बोर्डाची अशी खात्री पटली की, पुढील ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी कसोटी संघाला एका नवीन दिशेची आणि पूर्णपणे नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.




























































