
एलिफंटा बेटावर पर्यटक आधारित व्यवसाय करणाऱ्या ६९ भूमिपुत्र दुकानदारांनी दंडाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्याची तयारी दाखवली आहे. त्यानंतर सोमवारी कारवाईचा बुलडोझर चालवण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भूमिपुत्रांची उपासमार टळली आहे.
एलिफंटा बेटावर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या शेतबंदर जेट्टीपासून एक किमी अंतरापर्यंतच्या पोच मार्गापर्यंत १०३ स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत. मागील ५० वर्षांपासून हे स्थानिक गरीब व्यावसायिक छोटी-छोटी दुकाने चालवत. चणे-फुटाणे, मका, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या, शोभिवंत वस्तू, कटलरी सामान, खाद्य पदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहेत. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारितील जागा असल्याने भुईभाडे लागू करण्याची अनेक वर्षांपासून व्यावसायिकांची मागणी आहे.
नोटिसा बजावल्या
भुईभाड्याने देण्याबाबत ठरवलेल्या धोरणाचा हवाला देत १०३ स्थानिक दुकानदारांना प्रत्येकी जीएसटीसह लाखो रुपयांच्या व्याजासह दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. दंडाची रक्कम न भरल्यास दुकाने पाडण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. अखेर ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याचे ठरल्याने दुकाने तोडण्याची कारवाई थांबवली आहे, अशी माहिती बंदर अधिकारी विनायक करंजे यांनी दिली.



























































