
मॅनहोलमध्ये पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मॅनहोल्सच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करताना आता ‘मॅनहोल रेलगार्ड’चे सुरक्षा कवच राहणार आहे. यामध्ये लोखंडी चौकोनी ‘मॅनहोल रेलगार्ड’ बसवल्यानंतरच दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. ‘एल’ वॉर्ड कुर्लामधून या उपक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जात आहे.
मुंबईत या वर्षी पहिल्याच पावसात 2 जुलै रोजी साकीनाका कुर्ला येथे दुरुस्ती सुरू असताना मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता. यामुळे पालिकेला मोठय़ा टिकेचा सामना करावा लागला होता. शिवाय पावसाळापूर्व कामे करताना महापौर रितू तावडे तावडे यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी एक अधिकारीच मॅनहोल्समध्ये कोसळला होता. त्यामुळे पालिकेने आता मॅनहोल्स देखभाल-दुरुस्ती करताना आवश्यक सार्वजनिक सुरक्षितता राखत खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ‘मॅनहोल रेलगार्ड’चे प्रात्यक्षिक आज महापौर रितू तावडे, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. कुर्ल्यात ‘मॅनहोल रेलगार्ड’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर तेथील अनुभव पाहून तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱया सूचनांच्या आधारे ‘मॅनहोल रेलगार्ड’ची जडणघडण कशी असावी याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
अशी आहे संकल्पना
‘मॅनहोल रेलगार्ड’ची रचना मॅनहोलभोवती लोखंडी कुंपणासारखी असेल. याच्या मधे मॅनहोल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी जागा राहील. मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमी-जास्त करता येईल. काळोखावेळी दृश्यमानता वाढावी यासाठी त्यावर परावर्तक रंग, लुकलुकणारे दिवे बसवण्यात येतील. चौकोनी आकाराच्या ‘मॅनहोल रेलगार्ड’ची रचना मजबूत आणि सुटसुटीत राहील. उंची 1 मीटर, लांबी 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असा असेल.






























































