
सहाय्यक परिचारिका प्रसाविका (एएनएम) आणि सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम) या नर्सिंग पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता सीईटीची परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत राबवली जाईल.
सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत येणाऱ्या एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत होते, मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील ही प्रक्रिया महाविद्यालय स्तरावरच राबवली जात होती. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या धर्तीवर या नर्सिंग अभ्यासक्रमांनाही सीईटी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.





























































