
पंतप्रधान नळजल योजनेतही भ्रष्टाचाराचे पाणी मुरत असून छत्तीसगडमध्ये अनेक गावांमध्ये या योजनेतून उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यामधून पाणीच येत नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. याविरोधात शिवसेनेने तीव्र आंदोलन करत प्रशासन आणि सरकारला दणका दिला.
शिवसेनेचे छत्तीसगड राज्यप्रमुख डॉ. आनंद सिंह मल्होत्रा आणि मुंगेली जिल्हाप्रमुख संतोष साहू यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील अनेक गावांमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने झटापट झाली. काही काळ तणाव निर्माण झाला.
टाक्या आहेत, पण पाणी नाही !
विभागीय अधिकाऱ्यांना भेटून शिष्टमंडळाने निवेदन दिले. पंतप्रधान नळ योजनेबाबत असंख्य तक्रारी आहेत. टाक्या बांधल्या पण त्यातून पाणी येत नाही. त्यात अनेक ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होतो. या समस्या तत्काळ सोडवा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी दाऊराम चौहान, इंद्रपुमार साहू, धर्मेंद्र यादव, रामायण साहू, ओ. पी. यादव, भानू निषाद, ओमप्रकाश यादव उपस्थित होते.





























































