आयटीआयच्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर, ४४,६८० विद्यार्थ्यांना जागा वाटप, १६ जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दुसऱ्या प्रवेश फेरीची वाटप यादी जाहीर झाली आहे. या दुसऱ्या फेरीत राज्यातील ४४ हजार ६८० विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आले असून त्यांना १६ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लॉगीनमध्ये तसेच एसएमएसद्वारे याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

पहिल्या प्रवेश फेरीत ७८ हजार ४९६ विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती, ज्यापैकी ४२ हजार २० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात प्रवेश घेतला आहे. यामध्ये शासकीय आयटीआयमधील ३२ हजार ८२६ आणि खासगी आयटीआयमधील ९ हजार १९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चालू प्रवेश प्रक्रियेदरम्यान ज्या उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रांची कमतरता असेल, त्यांना ती पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे लेखी हमीपत्र देऊन तात्पुरता प्रवेश निश्चित करण्याची सवलत देण्यात आली आहे. आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया १६ जुलैपर्यंत चालणार आहे. तांत्रिक अडचणी आल्यास विद्याथ्यर्थ्यांनी संबंधित संस्था किंवा मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तिसरी फेरी १३ जुलैपासून खुली
तिसऱ्या प्रवेश फेरीसाठीचे पर्याय अर्ज भरण्याची सुविधा आज १३ जुलैपासून खुली करण्यात आली आहे.

 

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत पसंतीचा ट्रेड अथवा संस्था मिळालेली नाही किंवा ज्यांना अद्याप कोणतीही जागा मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत पर्याय बदलण्याची किंवा नवीन पसंतीक्रम देण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय राज्यातील ५८६ खासगी आयटीआय संस्थांमधील रिक्त जागांसाठीची संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियाही १३ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.