
शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना शिवसैनिकांनी सळो की पळो करून सोडले आहे. कट्टर शिवसैनिक नंदकुमार देशमुख यांनी फोन करून ‘साहेब, तुम्हाला गद्दारी भोवणार, शंभर टक्के खात्रीने सांगतो, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही!’ असे सुनावले. सध्या हिंगोली मतदारसंघात या व्हायरल ऑडिओ क्लिपचीच चर्चा आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशीवचे खासदार ओम निंबाळकर यांना शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून निवडून आणले. मात्र पैशाच्या लालसेपोटी हे तीनही खासदार शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेले. गद्दारी केल्यानंतर या तीनही खासदारांना शिवसैनिकांनी ‘ऑपरेशन तुडवा’ची झलक दाखवली. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून वाशिमचे गद्दार खासदार संजय देशमुख हे तर मागच्या मागे पळाले आणि नागेश आष्टीकर तसेच संजय जाधव यांची पळता पळता वाट लागली. ‘ऑपरेशन तुडवा’ची पोलिसांनी एवढी धास्ती घेतली की, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना अटक करावी लागली.
गद्दारी केल्यापासून शिवसैनिकांनी नागेश आष्टीकरांना सळो की पळो करून सोडले आहे. हदगाव तालुक्यातील इरापूर येथील कट्टर शिवसैनिक नंदकिशोर देशमुख यांनी आष्टीकरांना फोन करून गद्दारी केल्याबद्दल खडे बोल सुनावले. ‘एक एक मतासाठी दारोदार फिरलो, रक्ताचे पाणी करून तुम्हाला निवडून आणले; पण शिवसैनिकांच्या स्वाभिमानी रक्ताचा तुम्ही अपमान केला. आता तुम्ही कदापि निवडून येणार नाही, शंभर टक्के खात्रीने सांगतो…’ अशा शब्दांत देशमुख यांनी आष्टीकरांचे कान उपटले.
आम्ही शिवसैनिकांनी मशालीच्या प्रचारासाठी जिवापाड मेहनत केली. गावोगाव हिंडलो. एक एक मतासाठी मतदारांकडे याचना केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला जीव लावला. तुमच्यावर विश्वास ठेवला. पण तुम्ही काय केले? गद्दारी ! आता लोक तुम्हाला कदापि निवडून देणार नाहीत असे देशमुख यांनी सुनावले.


























































