
मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने नागरिकांचा घाम निघाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहरात कमाल तापमान 33 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलक्या पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता असली तरी मुसळधार पावसाची शक्यता नाही.
दुपारी 12.04 वाजता 4.73 मीटरची भरती
मुंबई किनारपट्टीवर मंगळवारी भरती-ओहोटीचा प्रभावही जाणवणार आहे. दुपारी 12.04 वाजता 4.73 मीटर उंचीची भरती, तर रात्री 11.54 वाजता 4.14 मीटर उंचीची आणखी एक भरती येण्याचा अंदाज आहे.
याशिवाय सायंकाळी 6.08 वाजता 1.57 मीटर उंचीची ओहोटी असेल. तर 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 0.20 मीटर उंचीची ओहोटी अपेक्षित आहे.
गेल्या 24 तासांत अत्यल्प पाऊस
दरम्यान, 13 जुलै रोजी सकाळी 8 ते 14 जुलै रोजी सकाळी 8 या 24 तासांच्या कालावधीत मुंबईत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहरात सरासरी 0.15 मिमी पाऊस, पूर्व उपनगरात 0.12 मिमी पाऊस तर पश्चिम उपनगरात केवळ 0.01 मिमी पावसांची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.


























































