
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावात निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, डोळ्यांदेखत सोन्यासारखे भाताचे पीक सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. हंगामाच्या सुरुवातीला बळीराजाने बियाणे शेतात पेरले होते. अहोरात्र चिखलात राबून शेतात हिरवी रोपे लावली होती. पण, ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण कोंडये गाव चिंतेच्या छायेत बुडाले आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे शेतातील माती कोरडी ठणठणीत पडली असून, डोलणारी कोवळी रोपे आता पिवळी पडून कोमेजून गेली आहेत.
या संकटात पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख अधिक वाढले आहे. कोंडये परिसरामध्ये शेताच्या आजूबाजूला कोणतीही नदी किंवा वाहाता नाला नाही. जर एखादा पाण्याचा स्त्रोत असता, तर शेतकऱ्यांनी डिझेल पंप किंवा मोटर आणून पाणी शेताकडे वळवले असते आणि सुकणारे पीक वाचवले असते. पाण्याचा कोणताही पर्यायी स्त्रोत नसल्याने हतबल बळीराजा केवळ आभाळाकडे डोळे लावून सुकणारी शेती उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे काहीही करू शकत नाही.
कोकणातील बळीराजासाठी भात शेती हे केवळ पीक नाही, तर त्याच्या संपूर्ण वर्षाची गुजराण याच पिकावर अवलंबून असते. डोळ्यांदेखत स्वप्नांची राखरांगोळी होत असताना पाहून शेतकरी कुटुंबांचे अन्न-पाणी सुटले आहे. आता शासकीय पातळीवरून कृषी विभागाने तात्काळ या भागाची पाहणी करून कोंडये गावातील शेतकऱ्यांना धीर द्यावा आणि त्यांना तातडीने भरीव मदत जाहीर करावी, हीच एक आशा उरली आहे.
नेहमी गावाच्या सुखादुःखात खंबीरपणे उभे राहणारे कोंडये गावचे माजी सरपंच आणि स्थानिक शेतकरी सुरेश दसम शेतात उभे राहून सुकलेली रोपे हातात घेताना अत्यंत भावुक झाले. आपल्या भागातील बळीराजाची ही दयनीय अवस्था मांडताना त्यांचाही कंठ दाटून आला. प्रशासनाचे लक्ष वेधताना ते आर्ततेने म्हणाले, आम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, पोराबाळांसारखं या पिकाला जपलं. पण आता आकाशात ढग येत नाहीत आणि डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पंपाने पाणी ओढायला जवळ नदी-नालाही नाही. आमचा घास आता निसर्गानेच हिरावून घेतलाय. गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंब आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे ते म्हणाले.


























































