नितीन जंक्शनवर २४ तास तिसऱ्या डोळ्याची नजर; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील वर्दळीचा हॉट स्पॉट ओळखल्या जाणाऱ्या नितीन कंपनीच्या जंक्शनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) अंतर्गत आठ एआय-आधारित सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे सिग्नल जम्पिंग, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईनचा भंग, ट्रिपल सीट, हेल्मेटविना दुचाकी चालवणे तसेच सीट बेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्यांवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे.

नितीन कंपनी जंक्शन परिसरात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. येत्या काही दिवसांत ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल ३५० अत्याधुनिक आयटीएमएस कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शनवर १२ अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत तर आता नितीन कंपनी जंक्शनवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

गुन्हेगारीला आळा बसणार
पुढील टप्प्यात तीन हात नाका, माजिवडा, कापूरबावडी, आनंदनगर, ओवळा, अंजूर फाटा, कल्याण नाका आणि दिघे चौक येथेही आयटीएमएस कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. संपूर्ण यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून वाहतुकीवर सतत नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यांतील रस्त्यावरील वाद टळणार असून गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे.