
शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीच्या घटनेनंतर पीडित डॉ. वैभव साळुंके यांच्या आईने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आयुष्यभर संघर्ष करून एकल माता म्हणून मुलाला डॉक्टर बनविले. त्याच मुलावर रुग्णालयात अमानुषपणे हल्ला झाल्याची वेदना कष्ट देणारी असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘माननीय न्यायालयासमोर पोत्याने पैसा ओतून वकील लावले तरी देवाच्या न्यायालयात सुटका नाही,’ असा तळतळाट या माऊलीने हल्लेखोरांना दिला आहे.
डॉ. वैभव साळुंके यांच्या आईची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मुलाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना पाहताना एका आईच्या मनावर काय बेतली असेल याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. मुलाला आपण कधी साधा मारही दिला नव्हता, मात्र सत्तेच्या माजातून जीवघेणा हल्ला केला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मारहाणीच्या घटनेमुळे मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आठ दिवस उलटूनही मानसिक तणावातून सवरलेला नासिक पिता न बचावासाठी हात वर करतो. संपूर्ण कुटुंब मानसिक वेदना सहन करत असून तणावात आहे, असे डॉ. वैभव यांच्या आईने पोस्टमध्ये म्हटले आहे.
म्हात्रेची रवानगी आधारवाडी कारागृहात
रमेश म्हात्रे यांच्यासह चारही आरोपींना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज या प्रकरणाची व्हिडीओ कॉ न्फरन्सिंगद्वारे सुनावणी न्याय दंडाधिकारी श्रीमती के. एस. कातकडे यांच्या दालनात पार पडली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
वकिलांचे आंदोलन
शुक्रवारी रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते. त्यावेळी पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन करून धमकावले होते. याचा निषेध करण्यासाठी आज कल्याण बार असोसिएशनच्या वकिलांनी न्यायालय परिसरात आंदोलन केले. न्यायालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होऊ न देता वकिलांनी आपल्या कोटावर लाल फित बांधून पोलीस प्रशासनाचा निषेध केला.





























































