पेपर लीक करणारे मोकाट आणि ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली ते शिक्षा भोगतायत, TET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेचा (TET) पेपर 27 जून रोजी फुटला होता. परिक्षेच्या एक दिवस आधी पेपर लिक झाल्याने राज्यातील तब्बल सहा लाख विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. आता पेपरफुटीला पंधरा दिवसाहून अधिक काळ झाला असून अद्याप सरकारने परिक्षेची नवी तारिख जाहीर केलेली नाही. त्यावरून काँग्रेस खासदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या परिक्षेची तारिख लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

”महाराष्ट्र TET चा पेपर लीक झाला, परीक्षा रद्द झाली. सहा लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. दोन आठवडे झाले, तरी नवीन तारिख जाहीर झालेली नाही. पेपर लीक करणारे मोकाट फिरत आहेत, सिस्टीम निष्कलंक असल्याचे दाखवले जात आहे आणि ज्याने प्रामाणिकपणे मेहनत केली तो मात्र शिक्षा भोगत आहे. हे देशाचे सध्याचे आणि होणारे शिक्षक आहेत ज्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे – हे तेच लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे तयारी केली, फॉर्म भरले, फी दिली आणि लांबच्या परीक्षा केंद्रांपर्यंत प्रवास केला आणि आता ते फक्त वाट पाहत आहेत. कोणतीही तारीख नाही, कोणतेही उत्तर नाही”, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

यासोबतच त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. ” TET परिक्षेची नवीन तारीख आजच घोषित करा, पेपर लीकसाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा, उमेदवारांवर नाही. पेपर लीकमुळे ज्यांचे वर्ष वाया गेले, त्यांना वयोमर्यादेत सवलत देण्यात यावी”, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.