
देशातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमधील स्वच्छतेवर आता प्रवाशांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते २१ जून या अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत देशभरातील वंदे भारत गाड्यांमध्ये स्वच्छतेशी संबंधित तब्बल ३२७ तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या प्रीमियम सेवेच्या दाव्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रेल्वेकडून वंदे भारत गाड्यांना देशाची शान म्हणून पाहिले जाते आणि त्यासाठी प्रवाशांकडून प्रीमियम भाडेही आकारले जाते. मात्र प्रत्यक्षात या गाड्यांमधील स्वच्छतेचा दर्जा घसरत असल्याचे प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींवरून समोर आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडे आलेल्या या ३२७ तक्रारींमध्ये प्रामुख्याने अस्वच्छ प्रसाधनगृहे, डब्यांमधील अस्वच्छता, साचलेला कचरा आणि सीटवरील डाग यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. जास्त पैसे मोजूनही जर प्रवासात साधी स्वच्छता मिळत नसेल, तर या प्रीमियम सेवेचा उपयोग काय, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
एवढ्या कमी कालावधीत स्वच्छतेबाबत इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या वाढत्या तक्रारींनंतर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारांना स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा दर्जा आणि प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल, तर रेल्वे प्रशासनाला स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने ठोस पावले उचलावी लागतील, हे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.




























































