
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या जून-जुलै २०२६ च्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता १० वीचा निकाल १२.२६ टक्के, तर १२ वीचा निकाल २०.१० टक्के लागला आहे.
कोकण विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मिळून इयत्ता १० वीच्या परीक्षेत एकूण २८८ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी २६९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ७०० विद्यार्थी नोंदणीकृत असून ६४८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात घट झाली आहे. इयत्ता १० वीचा जून-जुलै २०२५ चा निकाल २६.६५ टक्के होता, तो यंदा १५.३९ टक्क्यांनी घसरून १२.२६ टक्क्यांवर आला आहे. तसेच, १२ वीचा जून-जुलै २०२५ चा निकाल ३२.०५ टक्के होता, जो यंदा ११.९५ टक्क्यांनी घसरून २०.१० टक्क्यांवर आला आहे.
जिल्हानिहाय कामगिरी पाहता, इयत्ता १० वीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल १६.२० टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ०४.४४ टक्के लागला आहे. इयत्ता १२ वीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल १९.८९ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल २४.६७ टक्के इतका लागला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनुसार, इयत्ता १० वीच्या परीक्षेत मुलांचा निकाल ०९.०४ टक्के तर मुलींचा निकाल २१.४२ टक्के लागला आहे. इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलांचा निकाल १७.९७ टक्के आणि मुलींचा निकाल २८.०० टक्के इतका आहे.
दरम्यान, परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय व्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयातील संपादलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवार, दि. १५/०७/२०२६ ते शुक्रवार, दि. २४/०७/२०२६ या कालावधीत विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरू शकतील. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची गैरप्रकार प्रकरणे (कॉपी केसेस) आढळून आलेली नाहीत. परीक्षेनंतर निदर्शनास आलेल्या गैरप्रकारांबाबतची प्रकरणेही अत्यंत कमी असून ती इयत्ता १० वीसाठी ०४ आणि १२ वीसाठी ०१ इतकीच आहेत.





























































