
कोकणातील दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून इच्छुक कलाकारांसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या आठही तालुक्यांमध्ये कलाकार, मंडळे तसेच या लोककलेशी संबंधित विविध घटकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. दशावतार ही कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग परिसरातील समृद्ध लोकनाटय़ परंपरा असून, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी ही कला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या परंपरेचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वेक्षणाचा हा उपक्रम सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या मार्गदर्शनासाठी राबवला जात आहे.






























































