आंजर्ले तरी बंदरावर आगीत दोन मासेमारी बोटी जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तरी बंदरावर मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार्किंगसाठी उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत दोन ते तीन बोटी पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ज्वाळांनी शेजारी उभ्या असलेल्या बोटीही वेढल्या. घटनास्थळी उपस्थित मच्छीमार व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.