
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदरावर मंगळवारी (14 जुलै 2026) रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार्किंगसाठी उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत दोन ते तीन बोटी पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ज्वाळांनी शेजारी उभ्या असलेल्या बोटीही वेढल्या. घटनास्थळी उपस्थित मच्छीमार व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून आणखी बोटींचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून नुकसानाचा नेमका आकडा प्रशासनाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. घटनेमुळे आंजर्ले तरीबंदर परिसरात मोठी गर्दी झाली असून मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.






























































