मोशी दुर्घटनेनंतर पालिकेला जाग प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र एसओपी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे मोशी दुर्घटनेनंतर महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डंपिंग ग्राऊंडच्या ठिकाणी सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी तयार केली जाणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा आणि सुरक्षात्मक बाबींचा फेरआढावा आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प.उपनगरे) डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला. यावेळी उपआयुक्त (घ.क.व्य.) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता अविनाश काटे तसेच विविध प्रकल्पांचे कंत्राटदार उपस्थित होते.

आगीच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी

देवनार येथील कचऱयापासून ऊर्जा निर्मिती (वेस्ट-टू-एनर्जी) प्रकल्प आणि वर्षोनुवर्षे साचून असलेल्या कचऱयात (लिगसी वेस्ट) आग व मिथेन वायूशी संबंधित धोक्यांचे परीक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. घनकचऱ्यापासून निर्मित इंधन (रिफ्यूज डिराईव्हड फ्यूएल) साठय़ामुळे आगीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. प्रमुख अभियंता आणि उप प्रमुख अभियंता यांनी आठवडाभरात सर्व प्रकल्पस्थळांना भेट देऊन सुरक्षा आणि कार्यपद्धतींच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

कचऱ्याची उंची मर्यादित ठेवा

  • डंपिंग ग्राऊंडवरील कचऱयाची उंची निर्धारित मर्यादेत ठेवावी. प्रकल्प परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश द्यावा.
  • येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवावी, क्षेपणभूमी परिसरातील शेड, कार्यशाळा, देखभाल कंटेनर आदी सर्व संरचनांचे स्थिरता परीक्षण तातडीने पूर्ण करावे.
  • पावसाळ्याच्या अनुषंगाने, पर्जन्य जलवाहिनी आणि पृष्ठभागीय जलनिस्सारण व्यवस्थेचे सर्वंकष परीक्षण करावे.