
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरातील मटण-मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. उद्या १५ जुलैपासून ही बंदी लागू होणार असून, पुढील १५ दिवस म्हणजेच २९ जुलैपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे वारकऱ्यांनी स्वागत केले आहे.
विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी हळूहळू पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. या पवित्र काळात कोणत्याही भाविकांची धार्मिक भावना दुखावू नये, यासाठी प्रशासनाने शहरातील विविध भागांत सुरू असणाऱ्या मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत.
… तर कायदेशीर कारवाई
जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पुढील १५ दिवस म्हणजेच १५ जुलै ते २९ जुलै या काळात पंढरपूर शहरासह आसपासच्या परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.






























































