
एकीकडे अल्पवयीन मुलांवरील अत्याचारात वाढ झाली असतानाच पालघरमध्ये रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या संजय काशीद या पोलीस कर्मचाऱ्याने शेजारी राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. सातपाटी पोलिसांनी तत्परता दाखवत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा संजय काशीद हा पोलीस कर्मचारी पालघर मुख्यालयात कार्यरत आहे. संबंधित पीडित मुलगी ही आरोपी पोलीस कर्मचारी काशीद याच्या शेजारीच राहते. उसनवारीने पैसे मागण्यासाठी ती काशीद याच्याकडे गेली असता आरोपीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर कशीबशी सुटका करून घेत त्या मुलीने धावत घर गाठले व आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रसंग सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सातपाटी पोलिसांनी काशीद याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला काही तासांत बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
































































